Saturday, 24 November 2018

मन - अनाकलनीय रहस्य : भाग २

सुरुवात कशी करावी काही कळत न्हवते पण म्हणले हे अनाकलनीय गूढ जे आहे त्याच्या मागावर जाऊन त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करूया...

मन म्हणजे नेमकं काय?

ह्या प्रश्नाने माझ्या मनात काहूर मांडला. मन म्हणजे नेमकं आहे तरी काय?
कोणी म्हणतं की हृदया जवळ आहे कोणी म्हणतं की डोक्यात आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीने तर सरळ-सरळ  ते इथे म्हणजे हृदयात आहे असं ठासून सांगितलं आहे.
मला हा प्रश्न साधारणपणे मी वयाच्या आठव्या वर्षी असताना वैगेरे पडला असावा असा माझा अंदाज आहे.
पावसाळ्याचे दिवस होते, शाळेवरून घरी येत होतो, नेहमीप्रमाणे मी भिजलेला, मी बाहेरूनच हाक मारायचो आई....,आई यायची, मला जवळ ओढायची, टॉवेलने अंग पुसायची मात्र डोकं तेवढे तिच्या पदराने पुसायची.
त्यात काय तर्कशास्त्र होतं माहीत नाही पण तिचे व माझे नक्कीच समाधान होत होते.
एकेदिवशी असाच भिजलो होतो, त्या दिवशी तुफान पाऊस झाला होता. त्यादिवशी माझे बूट तळातून फाटले होते, तेव्हा मातीचे रस्ते असल्याने चिखल व पाण्याचा पातळ थर/ लगदा मोज्यातून येऊन माझ्या तळपायाला थंडगार स्पर्श करत होते. घरी आलो आणि आज आईला न बोलवता पहिला बूट काढून टाकलो आणि शिंकलो, आई लगबगीने बाहेर आली आणि माझी हालत बघितली. माझ्या पायाला अजिबात घाण खपत नसे म्हणून मी माझे पाय बाहेरच्या दगडावरती जोरजोरात घासत होतो. आमच्या बाल्कनी मधून एक पाणी जाण्यासाठी एक पाईप बाहेर काढून ठेवली होती व पाऊस असल्याने त्यातून पाणी येत होते, मी माझा पाय त्या पाण्याच्या धारेच्या खाली अलगद धरला बऱ्यापैकी चिखल निघाला. आई वाट बघत उभी होती, नेहमीप्रमाणे अंग पुसून तिच्या साडीच्या पदराने माझे भले मोठे डोके पुसली.
तळव्याला अजून चिकट असे लागत होते, वर पाय करून बघितलं तर अजून थोडासा चिखल होता. बहुतेक पायाच्या दाबामुळे ते घट्ट चिकटून बसले होते. मला त्याला हात लावावसा वाटेना. आईचे डोके पुसून झाले व मी नाराजीच्या सुरात आईला म्हणालो, "आये, हे पायाखालचं पण पूस बाई, कणकेच्या पिठासारखे ते मला चिकटून बसले आहे". आईने ते बघितले व मी अलगद पाय वर केला, जशी गाय आपल्या वासरावर जिभ फिरवून प्रेम व्यक्त करते तशाच प्रकारे आई सुद्धा माझ्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत माझ्या तळपायाला लागलेले चिखल तिच्या हाताने धुतले.
पण तिने जे सांगितलं ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहिले ते असे, 'जोपर्यंत तू स्वतः घाण काढत नाहीस तोपर्यंत ती गोष्ट तशीच राहणार अगदी घाणेरडी व मळकट, जसे स्वतःचे हात-पाय घाण होऊ नये म्हणून तू जेवढं प्रयत्न करतो त्याप्रमाणे स्वतःचे मन घाण होऊ नये ह्यासाठी काही प्रयत्न करतोस का?'.
ह्या प्रश्नाने तेव्हा नाही मात्र नंतर जेव्हा भोवतालच्या गोष्टी ज्ञात व्हायला लागल्या तेव्हा मात्र सकाळच्या चिमण्यांच्या चिवचिवाट सारखे माझे 'मन' सुद्धा चिव-चिव करायला लागले.
अरेच्या, इथे पण आपोआप मन ही संकल्पना आलीच की, ती कशी काय बरं?
मन म्हणजे काय? 
काय कळेनाच...
तुम्हाला जर कळले तर नक्की सांगा बरे का.
वाट पाहतोय...

क्रमशः...

~अज्ञेय

Friday, 23 November 2018

मन - अनाकलनीय रहस्य : भाग १

नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या छोट्याश्या ब्लॉग वरती मनःपूर्वक स्वागत आहे.
आज म्हणले काहीतरी नवीन चालू करूया.
अजून संशोधकांना सुद्धा न समजणारे कोडे म्हणजेच आपले 'मन' किंवा पुलं म्हणतात तसे सर्वात स्वस्त एअरलाईन्स म्हणजेच 'मन' ह्याची सफर आपण करूया.
चला तर मग सुरुवात करू.

मन,
हे नक्की मंदिर आहे की कत्तलखाना?
इथे विचारांची पूजा होते की विचारांची भावना लक्षात न घेता त्यांचे कत्तल होते.
समजा आपण तोंड उघडले नाही किंवा हातापायांची हालचालच नाही केले तर ते शांत बसू तरी शकतात पण 'मन' कधी शांत बसले आहे का?
पटत नसेल तर २ मिनिटे शांत बसून पहा,
बसत नाही ना शांत?
विचारांची खेळी झाली किंवा २ विचार एकमेकांच्या समोर आले तर आपली गोची होते व आपण म्हणतो की आपले डोके दुःखायला लागले.
पण खरे असे होते तरी का?
आपणच जास्ती विचार करून स्वतःच्याच विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जातो की दुसऱ्याने लादलेल्या विचारात गुरफटून जाऊन दबून जातो?
मला तर वाटते ह्यापैकीच एखादे कारण असावे आपल्या डोकेदुखीचे.
निसर्गाकडून मानवाला मिळालेली मन एक अमूर्त देणगी तर आहेच त्यासोबत मन हे एक बेधुंद, बेधडक व बुद्धिमान शस्त्र आहे ज्याच्या 'मनमार्गा' (मनाचा मार्ग) वर राहून आपण 'यशाचे' शिखर पादाक्रांत करूया.
बाकी कसे आहात?
मजेत ना?
आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.
भेटू पुढच्या भागात.

क्रमशः...

~अज्ञेय...